महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलली, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

 करोना संकटाच्या पार्श्वभूनीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्य सचिवांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती दिली. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. करोना संकट टळलं नसल्याने एकीकडे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असताना केंद्र सरकार मात्र परीक्षा घेण्यावर ठाम आहे. त्यातच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

याआधी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या पूर्वपरीक्षेचे जिल्हा स्तरावर केंद्र बदलून द्यावे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून वारंवार मागणी करूनही आयोगाने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांनी आता थेट न्यायालयात धाव घेतली होती.

ही परीक्षा आतापर्यंत दोन वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वात आधी ही परीक्षा नियमित वेळापत्रकानुसार एमपीएससी पूर्व परीक्षा सर्वात आधी ५ एप्रिल २०२० रोजी होणार होती. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन १३ सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचे निश्चित झाले. तसे परिपत्रक १७ जून रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र १३ सप्टेंबरलाच नॅशनल एलिजीबीलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट आयोजित करण्यात आली. त्यामुळे एमपीएससी पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर ऐवजी रविवार २० सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र आता राज्यातील कोविड-१९ स्थितीमुळे केवळ पूर्व परीक्षाच नव्हे तर या दरम्यानच्या काळातील एमपीएससीच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राज्य सेवा पूर्व परीक्षेव्यतिरिक्त महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० ही ११ ऑक्टोबर रोजी होणार होती. तीही लांबणीवर पडली आहे.